संविधानाच्या प्रतीमध्ये पान 47 ते 63 पर्यन्त संविधानाच्या मसुद्यावरील चर्चा दिली आहे.
मसुदा समितीने स्वीकृत संविधानाचा मसुदा विचारविनिमयार्थ डॉ. आंबेडकर यांनी सभाग्रहासमक्ष प्रस्तुत केल्यावर संविधान सभेच्या सदस्यांनी डॉ. आंबेडकर व मसुदा समितीच्या कार्याविषयी जी मते मांडली आहेत त्यातील काही भाग येथे उद्घृत करून बाकी भागाचे संक्षिप्त विश्लेषण येथे दिले आहे.
संविधान सभेच्या एकूण 45 लोकांनी आपली मते मांडली. त्यापैकी 39 जणांनी डॉ. आंबेडकर यांचे व्यक्तिशः अभिनंदन, भरभरून कौतुक करून त्यांनी केलेल्या अभ्यासू, कष्टाच्या आणि विद्वत्तापूर्ण कार्याची मनापासून दखल घेतली, आणि मसुदा समितीतील इतरांचेही अभिनंदन केले.
तीन व्यक्तींनी इतर विषयावर चर्चा केली. तर एका व्यक्तीने अभिनंदन करू शकत नाही असे स्पष्ट सांगितले.
इतर दोन व्यक्ती ज्या मसुदा समितीवर होत्या परंतु पूर्ण वेळ काम करू शकल्या नाहीत, त्यांनी समितीत आपण केलेल्या मर्यादित कार्याची माहिती दिली आणि समितीच्या कार्याची प्रशंसा केली.
मसुदा समितीतील डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा वाटा यासंदर्भात श्री कृष्णम्माचारी यांनी त्याच सभाग्रहात मांडलेले मत येथे जसेच्या तसे उद्धृत करीत आहे.
” या सभागृहाला याची जाणीव असेल की, याच सभागृहाने मसुदा समितीवर ज्या सात सदस्यांची नियुक्ती केली होती त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला म्हणून त्याच्या जागी दुसऱ्यांना नियुक्त करण्यात आले. एका सदस्याचा मृत्यू झाला आणि ती जागा रिकामीच राहिली. एक सदस्य दूर अमेरिकेत निघून गेले आणि त्यांचीही जागा भरली गेलीच नाही. दुसरे एक सदस्य राज्याच्या राजकारणात व्यस्त होते, गुंतलेले होते आणि त्याप्रमाणात पोकळी निर्माण झाली होती. एक किंवा दोन सदस्य दिल्ली पासून फार दूर होते आणि कदाचित प्रकृती स्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांनी बैठकीत भाग घेतलाच नाही. याचा अंतिम परिणाम असा झाला की, या संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डॉ. आंबेडकर यांच्यावर आली आणि त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य नि:संशय अत्यंत समर्थपणे पूर्ण केले यात तिळमात्र शंका नाही आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत.”
श्री. टी. प्रकासम यांनी पाच सहा सदस्य गळाले आणि त्यांच्या जागाही भरल्या गेल्या नाहीत याला दुजोरा दिला.
याच बाबतीत संविधान सभेचे अध्यक्ष यांना लिहिलेल्या पत्रात डॉ. आंबेडकर यांनी म्हटले आहे की समितीच्या सर्वच बैठकींना बरेच सदस्य उपस्थित नव्हते परंतु आवश्यक गणसंख्या च्या उपस्थितीत सर्व निर्णय एकमताने अथवा बहुमताने घेण्यात आले. (पान 64)
श्री अनंत शयनम अय्यंगार यांच्या मते अस्तित्वात असलेल्या जुन्या पाश्चात्त्य संविधानाचे तुकडे जोडून हे संविधान निर्माण झाले आहे. संविधान म्हणजे हिंदुस्थान सरकारच्या 1935 च्या कायद्याची हुबेहूब नक्कल होय. पण साठी डॉ. आंबेडकर जबाबदार नाहीत तर आपण उत्तरदायी आहोत असे म्हटले आहे.
मात्र त्यांच्या या म्हणण्याला कोणीही दुजोरा दिलेला नाही.
भारतीय संविधान जर ती हिंदुस्थान सरकारच्या 1935 च्या कायद्याची हुबेहुब नक्कल असेल तर तो कायदा आहे तसाच स्वीकारला गेला असता, नवीन संविधान निर्माण करण्याची, त्यावर सभेतील मान्यवरांचा स्वातंत्र्या नंतरचा अतिशय महत्त्वाचा वेळ, श्रम वाया घालवण्याची गरजच वाटली नसती असे मत येथे प्रदर्शित करावेसे वाटते.
जगातील संदर्भ घेतलेल्या राष्ट्राच्या संविधानात 200 पेक्षा अधिक अनुच्छेद नाहीत. भारतीय संविधानात 395 अनुच्छेद आहेत.
श्री. एस. व्ही. कृष्णमूर्ती राव यांचे मते कोणतेही संविधान परिपूर्ण असू शकत नाही हे सत्य आहे.
शेवटी संविधानाची अंमलबजावणी कशी केली जाते यावर ते चांगले की वाईट ते ठरते.
वरील माहिती भारताचे संविधान (94 व्या सुधारणे पर्यंत अद्ययावत) उद्देशिका, अनुच्छेद 1 ते 395 आणि 12 अनुसूची सहित संपूर्ण संविधान, मिलिंद प्रकाशन वर्धा. याचे आधारे लिहीली आहे.
Dr. Surekha Bhagyawant
Leave A Comment